बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या सायकल मिरवणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्याबरोबर झाली. या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी समितीने आयुक्तांनी सांगितले की, याआधी कधीही कन्नड -मराठी असा वाद निर्माण झाला नाही. हा निषेध मोर्चा केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात आहे. बेळगावमध्ये काही बाहेरील कन्नड संघटनेचे लोक विनाकारण पोलिस आणि प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात त्या साऱ्यांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. समितीची सायकल फेरी ही ठरलेल्या मार्गाने व शांततेत होईल असेही सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त श्री. जगदीश यांनी चर्चेत भाग घेतला. समितीच्या शिष्टमंडळात श्री. मालोजी अष्टेकर, श्री.प्रकाश मरगाळे, श्री.रणजीत पाटील, श्री. नेताजी जाधव, रवी साळुंखे, श्री. संजय शिंदे, भरत नागरोळी व श्री. उमेश काळे यांचा समावेश होता. सायकल, फेरी व जाहीर सभा या कार्यक्रमाला मराठी माणसाने मराठी जनतेने प्रचंड संख्येने हजर राहावे, अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सायकल फेरी मूक असल्यामुळे कोणीही घोषणा देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर काळ्यादिनी मराठी भाषिकांनी आपल्या घरावर रोषणाई करू नये व आकाश कंदील लावू नयेत अशी ही विनंती करण्यात आली आहे.