बेळगाव : बसुर्ते येथे धरण उभारणीच्या नावाखाली सर्व्हे करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सर्व्हे करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याला गावकऱ्यांनी विरोध करत जाब विचारला.
मागील काही दिवसांपासून गावातील २५० एकर जागेचे संपादन करुन धरण उभारण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली होती. परंतु याबाबत कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आलेली नाही. ग्रा. पं. ला माहिती देण्यात आली नाही. परंतु काहीजण पिकांतून सर्व्हे करत असल्याचे गावकऱ्यांना समजले. यामुळे शेतकऱ्यांनी याची माहिती धनंजय जाधव यांना दिली. त्यांनी गुरुवारी भेट देत सर्व्हे करणाऱ्यांना जाब विचारला.
कोणत्या खात्याकडून सर्व्हे करण्यात येत आहे, याबाबतची माहिती विचारली. यावर गर्भगळीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपण खासगी कंपनीच्या माध्यमातून सर्व्हे करत असल्याचे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. कोणतीही माहिती नसताना सर्व्हे करता कसा, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांची कानउघाडणी केली. यामुळे ते कर्मचारी माघारी फिरले. यावेळी गावकऱ्यांनी जबरदस्तीने सुरू असलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. भूसंपादनाबाबत प्रशासनाने आठवड्यात माहिती द्यावी. जबरदस्तीने भूसंपादन केल्यास बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सर्व्हेचे काम थांबवण्याचीही सूचना करण्यात आली.
यावेळी गावकऱ्यांसह नेताजी बेनके, पवन देसाई, यतेश हेब्बाळकर, मिथील जाधव आदी उपस्थित होते.