बिदर : सीमाभागात 1 नोव्हेंबर हा काळा दिन व सुतक दिवस म्हणून पाळण्यात येतो. बोन्थी तालुका औराद बिदर येथे समितीचे अध्यक्ष रामराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना रामराम राठोड म्हणाले की, गेली 69 वर्ष सीमाभागातील मराठी भाषिकांनी आंदोलने, मोर्चे उभे केले आहेत. सीमा भागातील चार पिढ्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहेत. 1956 च्या तात्कालीन नेहरू सरकारने केलेली चूक ही विद्यमान केंद्रातील मोदी सरकारने सुधारावी व अन्यायाने कर्नाटकाला जोडला गेलेला मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्राला परत करावा.
यावेळी बिदर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव पृथ्वीराज पाटील, सदस्य डॉ. संजय मुळे, ऍड.भास्कर कुलकर्णी, प्रा. देविदास पाटील, जीवनराव शिंदे, विठ्ठलराव पाटील, प्रा. दिलीप पाटील, रामदेव पाटील, रामदेव चिमुरडे, देवदेव पाटील, डॉ. खोंडे, ॲड. रमेश बिरादार आदी उपस्थित होते.