राज्य सरकारचा आदेश जारी
बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी सरकारी कार्यालये आणि कार्यालय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालणारा आदेश जारी केला.
धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानीकारक असून सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
कर्नाटक राज्य नागरी सेवा (आचार) नियम, २०२१ च्या नियम-३१ मध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेय किंवा मादक पदार्थाचे सेवन करण्यास मनाई आहे.
वैधानिक इशारे देऊनही सरकारी कार्यालये आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सरकारच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी आणि सार्वजनिक व सरकारी कर्मचाऱ्यांना सेकंडहँड स्मोकपासून वाचवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारी कार्यालये आणि परिसरात धूम्रपानासह तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.
याबाबतचा सूचना फलक कार्यालयात योग्य ठिकाणी लावण्यात येईल. या सूचनांचे उल्लंघन करून कार्यालयात किंवा कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा, पान मसाला इ.) धूम्रपान करताना आणि सेवन करताना आढळलेल्या कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.