खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने येऊ लागला. त्यामुळे सावध असलेल्या दुचाकीस्वारांनी तात्काळ आपली दुचाकी वळविली व माघारी फिरले.
तोराळी येथील जेसीबी मालक आकाश पाटील व त्यांचा जेसीबी चालक प्रदीप चव्हाण हे दोघेजण आपले काम आवरून दुचाकीवरून तोराळी गावाकडे जात असताना सदर घटना घडली आहे. त्यासाठी या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तसेच वन खात्यानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, सदर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.