बेळगाव : “स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या बेळगाव पायोनियर बँकेसारख्या बँकांनी समाजाप्रती मोठे काम केले आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या या बँका केवळ आर्थिक मॉडेल्स नाहीत तर त्या लोकशाही बळकट करणाऱ्या शाळा आहेत” असे विचार कर्नाटकचे मंत्री डॉ. एच. के. पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
भारत सरकारच्या सहकार खाते आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या “नागरी बँकांचे समाजातील महत्त्व” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
19 व 20 डिसेंबर असे दोन दिवस संकम हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या या परिसंवादाचे उद्घाटन शुक्रवारी श्री. एच. के. पाटील यांनी दीप प्रज्वलनाने केले.
सर्वात जुनी बँक म्हणून पायोनियर बँकेचे वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, “नॅशनल फेडरेशनने नागरी बँकांच्या संचालक व सीईओ यांना प्रशिक्षण देण्याचे जे कार्य सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे. या देशातील लहान बँकांचे अस्तित्वच राहू नये म्हणून गेल्या दोन दशकापासून केंद्र सरकार व रिझर्व बँक प्रयत्न करीत होते पण आता त्यांनी आपले धोरण बदलले असून आता बँकांना शाखा काढा, तांत्रिक प्रगती साधा असे सांगत असून प्रोत्साहन देणारे धोरण अवलंबिले आहे.
रिझर्व बँकेकडून प्रथमच हे सेमिनार आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे या भागात 1924 साली स्वातंत्र्यलढ्याबरोबरच इतर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. असेही ते म्हणाले
नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटीजचे अध्यक्ष श्री. लक्ष्मी दास यावेळी बोलताना म्हणाले की, या देशाचे आर्थिक क्षेत्र आणि लोकशाही मजबूत करण्याचे काम अर्बन बँक व क्रेडिट सोसायटी करीत आहेत. अर्बन बँकांकडे सहा लाख कोटीच्या ठेवी असून येथील 94 टक्के पैसा सुरक्षित आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पाठीशी सरकार असते मात्र नागरी सहकारी बँकांच्या पाठीशी कोण नसते त्यामुळेच गेल्या काही वर्षात सुमारे 500 बँका बंद झाल्या, असे म्हणाले.
रिझर्व बँकेचे श्री. मुरली कृष्णा यांनी बँकांच्या संचालकांची संबंधित वेगवेगळ्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचे माजी संचालक डॉक्टर एस. ए. सिद्धांति यांनी बँकांची बॅलन्स शीट कशी स्ट्रॉंग ठेवावीत याबाबत मार्गदर्शन केले.
दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रात बेळगाव जिल्ह्यातील अनेक बँकांच्या संचालकांनी सहभाग दर्शविला होता.