खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील लोकमान्य भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वर मंदिर येथून ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे. तसेच ग्रंथ दिंडीच्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज लावून परीसर भगवामय करण्यात आला आहे. तसेच दिवसभर मायमराठीच्या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे.
सकाळी ८ वाजता खानापुरातील ज्ञानेश्वर मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी निघणार असून आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, अरविंद पाटील, अंजली निंबाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे ग्रंथ दिंडीनंतर सकाळी नऊ वाजता केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कथाकार बबन पोतदार, गोव्यातील प्रसिद्ध कवयित्री चित्रा क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुंफण पुरस्कारांचे तसेच प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. अध्यक्षीय भाषण हा उद्घाटन क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग असणार आहे.
सकाळी ११ ते १२.३० या वेळेत गोव्यातील कवयित्री रजनी रायकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनात डॉ. चंद्रकांत पोतदार, चित्रा क्षीरसागर, रामचंद्र कांबळे, कृष्णा पारवाडकर, प्रकाश क्षीरसागर, महादेव खोत, चंद्रशेखर गावस, स्मिता किल्लेदार, स्वाती बाजारे, सु. ना. गावडे, लहूराज दरेकर, अमृत पाटील, कविता फडके, गुरुनाथ किरमीटे, प्राचार्य अरविंद पाटील सहभागी होणार आहेत.
दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत संगीत विशारद मष्णू चोर्लेकर व सतीश गच्ची यांच्यातील तबला जुगलबंदीचा रोमांच अनुभवता येणार आहे. १.३० ते २.३० या वेळेत स्नेहभोजन असेल. त्यानंतर २.३० ते ३.३० या वेळेत ‘आजच्या पत्रकारितेपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक हे परिसंवादाचे अध्यक्ष असून यामध्ये स्तंभलेखक अनिल आजगावकर, पत्रकार वासुदेव चौगुले व पत्रकार रंगकर्मी राजीव मुळ्ये सहभागी होणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता प्रेरणादायी वक्ते व प्रवचनकार प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संमेलनाचा समारोप समारंभ होणार असून याप्रसंगी स्थानिक मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्महाराष्ट्र पुरस्कार विजेते लेखक गजानन देसाई (गोवा), कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज अध्यासनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. के. पवार, ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील उपस्थित राहणार आहेत.