खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.
हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक 3 मधील 508 एकर जमीन गावकऱ्यांची सामाईक मालकीची आहे, परंतु या जमिनीच्या वाटप आणि नोंदी प्रक्रियेत नियमबाह्य प्रकार झाल्याचे समोर आले. संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही सखोल चौकशी न करता अर्जदाराच्या नावे जमिनीचा नकाशा तयार केला. गावाची मालकी असलेल्या जमिनीला खासगी स्वरूप देऊन फसवणूक करण्यात आली, तसेच कागदपत्रे आणि जमिनीचे मोजमाप प्रक्रियेत अपारदर्शकता होती.
या प्रकरणात प्रादेशिक भूअभिलेख कार्यालय, बेळगाव यांनी चौकशी करून अहवाल दिल्यानंतर या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. शासनाने त्यांच्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत भूसंपत्ती आणि महसूल व्यवस्थापन आयुक्तांनी निलंबनाचे आदेश जारी केले. यामध्ये अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू राहणार आहे.
या प्रकरणात माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावकऱ्यांनी तक्रारी करताच त्यांनी सरकार दरबारी प्रकरण उचलले आणि अन्याय झालेल्या गावकऱ्यांना न्याय मिळवून दिला. गावकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्यामुळे अखेर ही कठोर कारवाई घडली.