बेळगाव : श्रमिक अभिवृद्धी संघ, गुजरात भवन शास्त्रीनगर व शालीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरमूरी गावातील गणपती मंदिरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत कामावर जाणाऱ्या महिलांच्या अडचणी समजून घेऊन राहुल पाटील यांनी संघटनेच्यावतीने महिलांना मास्क, सॅनिटायझर व रेशन (अन्नधान्य) कीट वितरणाचा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला. तुरमूरी गावातील गणपती मंदिरात संध्याकाळी 8 दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवनचे विद्यमान अध्यक्ष रमेश लद्दडजी व ज्येष्ठ संचालक भुपेंद्र पटेलजी यांच्या हस्ते रोजगारावरील ज्या महिलांच्या कुटुंबाना निकडीची गरज आहे अशा काही मोजक्या महिलांना रेशन (अन्नधान्य) कीट व उर्वरित महिलांना मास्क व त्यांच्या गटांसाठी सॅनिटायझर वितरीत करण्यात आले. यावेळी राहुल पाटील यांनी कामावरील सर्व महिलांनी कोरोनाची लस घ्यावी व आपापल्या कुटुंबातील सदस्यांना घेण्यास प्रवृत्त करावे तसेच रोजगाराच्या कामावर निष्ठा ठेवून सरकारी मार्गसुचीचे पालन करुन कामे करावीत असे उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमाला जलाराम ट्रेडिंग कंपनी, प्रयत्न फौंडेशनच्या मधू जाधव, मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह प्रविण नेसरकर व लक्ष्मी चलवेटकर, कविता जाधव, वनिता बांडगे, रेश्मा तंगणकर, माया बेळगूंदकर (कायकबंधूं) या मान्यवरांनी बहुमोल मदत केली.