बेळगाव : युक्रेन- रशिया युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती मुळे जागतिक स्तरावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व समर्थ असल्याचा विश्वास, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी बोलताना व्यक्त केला.
शायना एन. सी. या जायंटस भवन उद्घाटनासाठी बेळगावला आल्या आहेत. आज सोमवारी दुपारी गुडशेड रोड येथील भाजप नेते किरण जाधव यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी कर्नाटक प्रदेश ओबीसी मोर्चाचे जनरल सेक्रेटरी किरण जाधव यांनी त्यांचे शाल- पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना शायना एन. सी. यांनी भारता शेजारील देशात आर्थिक संकटामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशावेळी भारतासमोर ही आव्हाने उभी आहेत. केंद्र सरकार जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहे. चिंताजनक परिस्थिती आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व खंबीर असेल तर भीती बाळगण्याचे कारण नाही असेही त्यांनी सांगितले.
शायना एन. सी. या जायंटस इंटरनॅशनलच्या वर्ल्ड चेअरपर्सन आहेत. सामाजिक कार्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, आपले पिताश्री नाना चुडासमा यांनी त्या काळच्या परिस्थितीनुसार सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने जायंटसची स्थापना केली. बदलत्या काळानुसार सामाजिक सेवाभावी कार्यातही अनेक बदल होत आहेत. सामाजिक कार्यात युवकांना आकर्षित करण्यासाठी जायंटसच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईच्या भायखळा रेल्वे स्टेशन, त्याचबरोबर गणेशोत्सव काळात इको-फ्रेंडली गणपती पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. सेव द गर्ल चाइल्ड माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या संदर्भात जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे केला जात आहे. सामाजिक कार्यात युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. हे निश्चितच समाधानाची बाब आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि बेळगावातील मराठी भाषिकांची हक्क डावलले जात असल्यास ते निश्चितच दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत श्रीमती मुनीराज चुडासमा, जायंटस सेंट्रल कमिटी सदस्य मोहन कारेकर, मदन बामणे आदी उपस्थित होते.