
बेळगाव : बेळगाव शहर उपनगरांसह संपूर्ण तालुक्यात भूमाफियांची टोळी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झाली असून या भूमाफियांकडून जमिनी बळकावण्यासाठी विविध प्रकारचे हातखंडे अवलंबण्यात येत आहेत. पोलिस प्रशासनाने अशा भूमाफियांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
बेळगावातील काही ज्येष्ठ नागरिक, महिला ज्यांची मुले कामानिमित्त परगावी असतात अशा ज्येष्ठांना गाठून त्यांना जमिनी विकून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कागदपत्रे हस्तगत करणे, त्यावर त्यांच्या सह्या घेणे त्यासाठी खोटे साक्षीदार उभे करणे असे प्रकार या भूमाफियांच्या हस्तकांकडून शहरात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असाच प्रकार दक्षिण मतदारसंघातील काही भागात झाल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच या टोळक्याने शहरातील एका वयोवृद्ध माजी आमदार देखील जमीन विकून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मुलांना या व्यवहारापासून अनभिज्ञ ठेवत त्यांची शहराच्या मध्यवर्ती भागातील जमीन अत्यल्प दरात करार करून पैसे दिल्याचे भासवून जमीन नावावर करून घेण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून झाल्याचे उघडकीस आले आहे. ज्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आली असता त्यांच्याशी चर्चा करण्यास देखील या टोळक्याने मनाई केल्याचे समजते. वयोवृद्ध माजी आमदार कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर कोर्टात सुरू असलेल्या दाव्याची पाटी लावली असता काल रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञातानी पाटी काढून टाकल्याचे निदर्शनास आले असून याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याची कल्पना पोलीस प्रशासनाला देऊन संबंधितांवर करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी आमदारांच्या वारसदारांनी त्यांच्या वयाचा विचार करून आपल्या स्थावर मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बेळगाव येथील प्रिन्सिपल सिव्हिल कोर्टातून मनाई आदेश घेऊन याबाबत स्थानिक वृत्तपत्रातून नोटीस प्रसिद्ध करून देखील सदर जमिनीचा व्यवहार या भूमाफियांनी केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव परिसरात बऱ्याच नवीन वसाहती वाढल्या आहेत. शहराबाहेरील शेतवाडीत प्लॉट पाडून त्याठिकाणी नवीन उपनगरे उभी करण्यात आली असून सदर प्लॉट खरेदी -विक्री करण्यासाठी 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार केले जातात. अशा 100 रु. बाँड वरील खरेदी केलेल्या प्लॉटची त्यांच्याच वारसदारांकडून अथवा जमीन मालकांकडून पुन्हा विक्री करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले असून या कामात शहरातील भूमाफियांची टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
अशाच प्रकारे जमीन हडप करण्याचा आणखीन एक प्रकार देखील येळ्ळूर शिवारात घडला असून याबाबत देखील जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याने दमदाटी करत मालकाला दोन वर्षे जमिनीपासून लांब ठेवले त्यानंतर खोटा जमीन मालक, खोटे आधार कार्ड, खोटे साक्षीदार, बनावट पॅन कार्ड धारक उभे करून सदर जमीन खरेदी करण्यात आली आहे. येळ्ळूर येथील शेत जमीन खरेदी विक्री प्रकरण ज्यावेळी मूळ मालकाच्या निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत बेळगाव उपजिल्हा अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली होती परंतु उपजिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करताच हा निकाल भूमाफीयांच्या बाजूने दिल्याने मूळ जमीन मालकाने आता जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. सदर जमीन खरेदी विक्री प्रकरणात बनावट आधार कार्ड आणि बनावट पॅन कार्ड वापरण्यात आले असून पॅन कार्ड वरील नाव, पत्ता आणि आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता यामध्ये तफावत आढळून आली आहे. तरी देखील सबरजिस्ट्रार अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करताच सदर खरेदी विक्री व्यवहार पूर्ण केल्याने या भूमाफियांना प्रशासकीय वरदहस्त आहे की कोणत्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद हे पाहणे आवश्यक आहे.
दरम्यान, या भूमाफियांच्या टोळीची नावं लवकर जाहीर करणार असल्याचे माजी आमदारांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta