
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सध्याच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न थकीत असताना अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी महापौर रमेश कुडची यांनी प्रशासकीय नियमांकडे लक्ष वेधले. १९७७ च्या कायद्यानुसार उपलब्ध निधी आणि अपेक्षित उत्पन्नाचा ताळमेळ घालूनच अर्थसंकल्प मांडला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचे उत्पन्न अद्याप थकीत असताना फुगीर अर्थसंकल्प कसा सादर केला, असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार काम करावे, असे रमेश कुडची यांनी म्हटले.
महानगरपालिकेच्या कर धोरणावर टीका करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी पाच वर्षांतून एकदा करवाढ होत असे, मात्र आता नियम बाजूला सारून अधिकारी मनमानी करत आहेत. शहरातील पथदिवे आणि कमांड कंट्रोल रूमचे व्यवस्थापन कोलमडले असून, सध्याच्या नगरसेवकांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा माजी नगरसेवक तीव्र आंदोलन करतील, असे रमेश कुडची यांनी स्पष्ट केले.
माजी महापौर नागेश सातेरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर सुधारण्याऐजी केवळ लोकप्रतिनिधी आणि अधिकारीच ‘स्मार्ट’ झाले असल्याची टीका त्यांनी केली. एकेकाळी करवसुलीत राज्यात अव्वल असलेल्या बेळगाव महानगरपालिकेची सध्याची स्थिती चिंताजनक असून, ७५ कोटींचे अनुदान कुठे गेले, असा सवाल नागेश सातेरी यांनी उपस्थित केला.
माजी महापौर शिवाजीराव सुंठकर यांनी सध्याच्या नगरसेवकांना जनहिताची कामे करण्याचा सल्ला दिला. जनतेला विश्वासात घेऊन कामे केल्यास नागरिक स्वतःहून तुमचा सत्कार करतील, अशी अपेक्षा शिवाजीराव सुंठकर यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रेणू किल्लेकर, नेताजी जाधव, वंदना बेळगुंदकर, दीपक वाघेला यांसह अनेक माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta