बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रीमूर्ती प्रतिष्ठापन करण्यास मंदिर किंवा कार्यालय नाही, तशा गल्लीची पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दहा बाय दहा मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन शुक्रवारी मार्केट पोलिस ठाण्यात झालेल्या लोकमान्य टिळक गणेश महामंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस सहाय्यक आयुक्त सदाशिव
कट्टीमनी यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे शासनाच्या आदेशामुळे गणेश मंडळांना गणेशाची स्वागत व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. सोबतच ढोल, ताशे, वाजंत्रीही लावता येणार नाही. आरतीला केवळ पाचच जणांना उपस्थित राहता येईल. मूर्ती चार फूट उंचीचीच असावी. आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत अशा सूचना मार्केटचे उपनिरीक्षक विठ्ठल हवणनवर यांनी केल्या. मार्केट पोलीस प्रशासनाने आज शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
प्रशासनाकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र मात्र माळी गल्ली टेंगिनकेरा गल्ली, रविवार पेठ, शिवाजीनगर पहिला क्रॉस, या ठिकाणी कोणतेही मंदिर किंवा कार्यालय नाही. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही. या गल्लीमध्ये पोलीस खात्याने प्रत्यक्ष पाहणी करून दहा बाय दहा आकाराचा मंडप उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुनील जाधव यांनी बैठकीत केली.
साहाय्यक पोलीस आयुक्त कट्टीमनी यांनी उपरोक्त चार गल्लीची पाहणी केली जाईल त्यानंतर त्या ठिकाणी मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले.
विजय जाधव म्हणाले बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही बेळगावातील गणेश मंडळांनी दिलीआहे.
यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी, मध्यवर्ती गणेश मंडळचे अध्यक्ष रणजित पाटील, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, राजकुमार खटावकर, सुनील जाधव, बाबूलाल राजपुरोहित, विश्वजित चौगुले, संजय नाईक, संजय पाटील विशाल मुचंडी, भालचंद्र गिंडे, मेघन लंगरकांडेसह आदी उपस्थित होते.