बेळगाव : अत्यंत निस्वार्थ वृत्तीने अवरीत सामाजिक कार्य करत असल्याबद्दल शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीने ‘सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले आहे.
मॅक्स लाईफ इन्शुरन्स कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक काशिनाथ नाईक आणि प्रशिक्षण व्यवस्थापक रवी बणकर यांनी संतोष दरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुरस्कारासाठीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे कर्मचारी, निमंत्रित आणि हितचिंतक उपस्थित होते. प्रामुख्याने रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवदान देण्याबरोबरच निराश्रितांना आश्रय मिळवून देणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख संतोष दरेकर हे त्यांच्या असामान्य सामाजिक कार्यामुळे बेळगाव शहर परिसरासह परगावात देखील सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन मॅक्स लाईफ इन्शुरन्सतर्फे त्यांना ‘सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्काराबद्दल संतोष दरेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
