बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून फुटपाथ व रस्त्याकडेला बिनदिक्कत अनेक प्रकारची दुकाने, व्यवसाय थाटण्यात आले आहेत. त्यामुळे पादचार्यांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. याबाबत आ. अनिल बेनके यांनी फुटपाथवरील दुकाने हटविण्याची सूचना पालिकेला आणि संबंधित अधिकार्यांना केली होती. पण अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आज शनिवारी सकाळपासूनच वाहतूक पोलिसांनी मनपा कर्मचार्यांच्या मदतीने जोरदार मोहीम राबवून फुटपाथवरील दुकाने, अतिक्रमणे हटवली. वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी स्वतःच पुढाकार घेऊन ही मोहीम राबवली. त्यामुळे या परिसरातील फुटपाथने मोकळा श्वास घेतला आहे.
