बेळगाव : रानमांजराची शिकार करणाऱ्या दोघा शिकाऱ्यांना कित्तूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. खानापूर वन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सौंदत्ती तालुक्यातील खोदानपूर वनविभागात रानमांजरांची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. खोदानपूर येथे शिकार करून शिकार केलेल्या रानमांजरांचे मांस त्यांनी बेळवडीतील हरिजन केरे येथील घरात दडवून ठेवले होते. वन अधिकाऱ्यांनी त्या घरावर छापा मारून रानमांजरांचे मांस, शिकारीसाठी वापरलेले ३ विळे, चाकू, डबे आदी साहित्य जप्त केले. या प्रकरणी बेलवडी येथील हनुमंत दुर्गप्पा होसूर, मल्लेश रामप्पा हावेरी यांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. बेळगावचे डीएफओ, आरएफओ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर उप वन संरक्षणाधिकारी संजय मगदूम, वनरक्षक अजित मुल्ला, गिरीश मेक्केद, तहसीलदार आदींनी या कारवाईत भाग घेतला.
