जायंट्स आय फौंडेशन आयोजित ‘नेत्रदान एक सामाजिक चळवळ’ व्याख्यान संपन्न
बेळगाव : दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन व्यक्तीना निश्चितच होवू शकेल. अर्थात एका व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना त्याचा उपयोग होईल, असे केएलई नेत्रविभाग प्रमुख डॉ. शिवानंद बुबनाळे यांनी सांगितले.
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून नेत्रदानाची जनजागृती केली जाते.
जायंट्स आय फौंडेशन आणि बी. के. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिन साजरा करण्यात आला.
“नेत्रदान एक सामाजिक चळवळ” यावर डॉ बुबनाळे यांनी स्लाईडशोद्वारे उपस्थितांना नेत्रदानाविषयी माहिती दिली.
प्रारंभी बी. के. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हंटले.
रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष शिवराज पाटील, संस्थापक मदन बामणे, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, डॉ. शिवानंद बुबनाळे, जायंट्स मेनचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, रेडक्रॉस विंगचे प्रमुख दिलीप वाडेकर उपस्थित होते.
यानंतर आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून नेत्रदानाविषयीची आपली वाटचाल आणि त्यावेळी येणारे अनुभव सांगुन आजपर्यंत जायंट्समुळे जवळपास शंभर अंध व्यक्तीना ही सृष्टी पाहता आली असल्याचे सांगितले.
बी. के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी आपण ज्याची निर्मिती करू शकत नाही, ज्या गोष्टी मानव निर्मित आहेत त्यांचे दान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांनी आणि जायंट्सच्या सदस्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन डॉ. बुबनाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कविता पाटील यांनी तर आभार दिलीप वाडेकर यांनी मांडले.