बेळगाव : राज्य शासनाकडून कलबुर्गी येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ उभारण्याची तयारी सुरू झाल्याने बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच आता चार दिवस उलटून गेले तरीही शासन आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग खंडपीठ बेळगावमध्ये स्थापन करण्याच्या मागणीकरिता आंदोलन सुरू केले होते तसेच आता उपोषणाला देखील सुरुवात केली आहे. यावेळी सोमवारी चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको करून वकिलांनी आंदोलन छेडले त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला आणि उपोषणाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे शामियाना आणि व्यासपीठ उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी वकिलांनी उपोषणाला सुरुवात केली असून काँग्रेसचे पदाधिकारी तसेच अन्य आमदारांनी या ठिकाणी भेट देऊन वकिलांशी चर्चा केली तसेच आपल्या मागण्या मान्य करू असे आश्वासन देखील दिले.
वकिलांच्या साखळी उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये शामियाना आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी वकिलांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आजच्या साखळी उपोषणात बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. बसवराज सुलतानपुरी, अॅड. एस. वाय. गणमुखी, अॅड. आर. सी. पाटील, अॅड. अरुण मरेण्णावर, अॅड. अरीफ नदाफ, अॅड. अजय मडीयाळी, अॅड. प्रकाश पाटील आणि अॅड. किरण पुजेरी यांचा सहभाग आहे.
उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी याप्रसंगी अॅड. सचिन शिवन्नावर, अॅड. गिरीराज पाटील, संयुक्त सचिव अॅड. बंटी कपाही, अॅड. महांतेश पाटील, अॅड. अभिषेक उदोशी, अॅड. आदर्श पाटील, अॅड. इरफान ब्याल, अॅड. प्रभाकर पवार, अॅड. पुजा पाटील, अॅड. मारुती कामाण्णाचे आदी बहुसंख्य वकील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपस्थित आहेत.
