बेळगाव : मराठी भाषेतून सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या मोर्चावेळी गोंधळ घालू पाहणाऱ्या कन्नड रक्षण वेदिके शिवरामगौडा गटाच्या एका आगंतुक नेत्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले.
सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके, कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने भव्य मोर्चा काढला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या आणि प्रसिद्धीसाठी काहीही करणाऱ्या कन्नड नेत्यांनी याला विरोध करण्याचे ठरविले होते. आधीच आखलेल्या डावानुसार चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनात करवे शिवरामगौडा गटाचा जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकोडी मोर्चावेळी गडबड, गोंधळ माजविण्याचा प्रयत्नात होता. याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडतीही घेतली. त्यामुळे पोलीस आणि करवे कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. परंतु त्याला न बधता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अन्यत्र नेले. समितीला मोर्चाला परवानगी देता मग आम्हाला का नाही असा केविलवाणा वादही त्याने घातला.
