शेरी गल्ली कोपऱ्यात देवतांच्या भग्न प्रतिमा, कचरा केला संग्रहित
बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असूनही रहिवासी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराकुंड बनलेल्या पिंपळाच्या पाराने आज मोकळा श्वास घेतला. सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेरी गल्लीच्या कोपऱ्यातील पिंपळाच्या झाडाखाली टाकण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन आणि कचरा हटवण्यात आला.
रविवारी सकाळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली शेरी गल्लीच्या कोपऱ्यावर मोहीम सुरू करण्यात आली. समाजसेविका माधुरी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पिंपळाच्या पाराभोवती ठेवण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन केले. त्यानंतर पाराभोवती असलेला कचरा जमा करून महापालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला.
यावेळी माधुरी जाधव यांनी, देवतांचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. विरेश हिरेमठ राबवत असलेली मोहीम समाजासाठी खूप महत्त्वाची असून त्यांना सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
विरेश हिरेमठ यांनी, पिंपळाचे झाड चोवीस तास प्राणवायू देत असते. कोरोना महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे. देवदेवतांच्या प्रतिमांचा अपमान होणार नाही, याची काळजी घेऊया, असे सांगितले.
यावेळी बाळू निलजकर, निंगय्या बुरलकट्टी, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.