बेळगाव : बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन, हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे. मात्र कंपनीकडून गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. यमनापूर गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. शिवाय गावातील तरुणांना नोकरीत सामावून घेत नाहीत. हिंडाल्को कंपनीतून बाहेर पडणारे दूषित पाणी, जमिनीत मुरून, गावातील लोकांच्या विहिरीच्या पाण्यात मिसळत असल्याने, विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. कंपनीकडून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील करण्यात येत नाही. ऍसिडच्या पावडरमुळे गावात प्रदूषण पसरले आहे. या सर्वाला विरोध दर्शवून आज सोमवारी यमनापूर गावातील ग्रामस्थांनी महिलांसहित हिंडाल्को कंपनीवर निषेध मोर्चा काढला.