बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या जमिनीवर सरकारने विविध प्रस्ताव मांडले आहेत. बायपास, रिंग रोड, रेल्वे ट्रॅक यासारख्या योजना अंमलात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसीबी फिरवण्याचा घाट सरकारने घातला आहे.
या विरोधात शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनीही तीव्र विरोध व्यक्त केला असून आज बेळगुंदी येथे रिंग रोड विरोधात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले.
बेळगुंदी येथे म. ए. समिती युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी हुतात्मा स्मारकाचे पुजन आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुरेश राजुकर यांनी केले.
गावातील गल्लोगल्ली जनआक्रोश आंदोलन छेडून सरकारच्या रिंग रोडसाठी जमिनी संपादित करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या आंदोलनात तालुका म. ए. समितीचे नेते, कार्यकर्ते आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.