बेळगाव : कणबर्गी निवासी योजनेच्या अंमलबजावणीसह रखडलेली विविध विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी बुडाच्या येत्या दि. 25 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीस शहराच्या दोन्ही आमदारांसह सर्व सदस्यांनी उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरातील सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्यावतीने उपरोक्त मागणी वजा इशार्याचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी प्रांताधिकार्यांना सादर करण्यात आले. रखडलेली विविध विकास कामे आणि कणबर्गी योजना मार्गी लावून शेतकरी व नागरिकांचे हित साधले गेले पाहिजे. त्यासाठी बुडाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
तथापि भाजपचे आमदार आणि सरकार नियुक्त सदस्य गैरहजर राहत असल्यामुळे कोरम अभावी ही बैठक तीन वेळा रद्द होत आली आहे. परिणामी बुडाच्यावतीने कणबर्गी योजना क्र. 61 तसेच विविध रहिवासी योजनांमधील रस्ते, उद्याने आदी विकास कामे रखडली आहेत. याखेरीज आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आणि शहरातील विकास कामाला प्राधान्य देणारे प्रस्ताव देखील रखडले आहेत.
यासाठी भाजप आमदारांसह बुडा सदस्य आणि अधिकार्यांनी आता तरी शहाणे होऊन येत्या 25 मे रोजीच्या बैठकीला उपस्थित राहून संबंधित सर्व विकासकामांना चालना द्यावी. अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील प्रांताधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर, काँग्रेस नेते आर. पी. पाटील, आम आदमी पार्टीचे विजय पाटील, शेतकरी नेते राजू मरवे, एल. बी. सावंत, अर्चना मेत्री, सिद्धराय सिगीहळ्ळी, राजकुमार बोमन्नावर, एन. के. नलवडे आदींसह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …