बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”चा नारा दिल्यामुळे आज सीमा भागातील शेकडो सीमावासीय रेल्वेच्या सहाय्याने मुंबईकडे कुच करत आहेत. सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावर असंख्य सीमावासीय भगव्या झेंड्यासह आले होते. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, खानापूर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, नाही नाही कधीच नाही कर्नाटकात राहणार नाही. अशा घोषणा देऊन सीमावासीयांनी पुन्हा एकदा या सीमा लढ्याचे रणसिंग फुंकले आहे. महाराष्ट्र शासनाचे सोमवार दिनांक 27 पासून मुंबई येथे अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे लक्ष सीमा प्रश्नाकडे वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. सीमावासीय गेल्या 66 वर्षापासून हा लढत आहेत, या लढ्यासाठी सीमावासीय कोणत्याही बाजूने कमी नाहीत हे दाखवण्यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या माय मराठी भाषेच्या राज्यात जाण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने हा लढा लढत आहेत. लोकशाहीतील सर्व प्रकारचे आंदोलने सीमावासीय गेल्या ६६ वर्षापासून लढत आहेत. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात असल्याने या लढ्याला सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने व काळजीने लक्ष देऊन नजीकच्या काळात या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी व मराठी भाषिकांना लवकरात लवकर महाराष्ट्रात सामील करून घ्यावे यासाठी हे धरणे आंदोलन छेडत आहेत. यासाठी या सीमावासीय मोठ्या संख्येने रेल्वेमधून मुंबईकडे कुच करत आहेत. या तुकडीचे नेतृत्व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी, आर. एम. चौगुले, भागोजी पाटील, यल्लाप्पा रेमानाचे, अनिल पाटील, सोमनाथ पाटील, मदन बामणे, दीपक पावशे, संजय पाटील करत आहेत. या लढ्याला जात असताना सीमावासीयांनी मोठ्या उत्साहाने या लढ्यामध्ये भाग घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta