
बेळगाव : बेळगावची भूमी एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. या ठिकाणी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा सारख्या पराक्रमी व्यक्ती जन्मल्या. देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे सांगताना स्वातंत्र्य लढ्यात आणि उत्कर्षात बेळगावचे अतुलनीय योगदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
येडीयुराप्पा रोडवरील मालिनी सिटी येथे आयोजित जाहीर सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.
देशात सध्या स्टार्टरची खूप चर्चा होत असली तरी 100 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये या स्टार्टअपची सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात बाबुराव पुसाळकर या उद्योजकांनी आपल्या एका लहान युनिटच्या माध्यमातून केली होती. तेंव्हापासून बेळगाव हे अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र बनले आहे. येत्या काळात हे केंद्र अधिक सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
नव्या विकास योजना आणि प्रकल्पांना चालना देण्यात येत असल्यामुळे बेळगावच्या विकासालादेखील गती येणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्राचा कृषी अर्थसंकल्प हा आजच्या कृषी गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्याची तरतूद करणारा आहे असे सांगून रासायनिक खत, कीटकनाशक, कडधान्य, ऊस उत्पादन यासंदर्भात आपल्या सरकारने उचललेल्या पावलांची माहिती मोदीजी यांनी दिली.
बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा – बेळगाव -घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वे सेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. खर्गे हे नावालाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असून पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. तेंव्हा कर्नाटकातील जनतेने काँग्रेसच्या घराणेशाहीपासून सावध राहावे असे मोदी म्हणाले. काँग्रेसचे नेते हताश झाले असून मोदीला केंव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले आहे. जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी मिश्कीलपणे म्हटले.
पिण्याच्या पाणी पुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठवलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना याबद्दल नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. भाजपचे डबल इंजिन म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचेही ते म्हणाले.
बेळगावच्या जनतेचे प्रेम व आशीर्वाद अतुलनीय असून या प्रेम व आशीर्वादाने आम्हा सर्वांना दिवस-रात्र जनसेवा करण्याची प्रेरणा मिळते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. बेळगावसह कर्नाटकातील जनतेला मी विश्वास देतो की तुम्ही जे प्रेम आशीर्वाद देत आहात त्याची मी व्याजासह परतफेड करेन. भविष्यात बेळगावसह कर्नाटकाचा निश्चितपणे अधिकाधिक विकास करेन, असे ठोस आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिले.
आजच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना तेराव्या टप्प्याचे 16 हजार कोटी रुपयांचे अनुदान वितरण करण्याबरोबरच नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव हायटेक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे महत्त्वकांक्षी जनजीवन मिशन अंतर्गत 1120 कोटी रुपये खर्चाच्या पाच बहुग्राम योजना, 30 कोटी रुपये खर्चाच्या हलभावीसह इतर गावातील पाणी योजना, 410 कोटी रुपयांची सौंदत्तीसह अन्य गावांसाठी पाणी योजना, 565 कोटी रुपयांची कित्तूर -खानापूर तालुका पाणी योजना आणि अथणी – चिक्कोडी तालुक्यातील 43 कोटी रुपयांची पाणी योजना, रेल्वे विभागाची 1122 कोटी रुपयांची विविध विकासकामे आणि लोंढा -बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
जाहीर सभेची सुरुवात स्वरांजली संगीत संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नाड गीताने झाली. त्यानंतर कर्नाटक संस्कृती व परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधानांना खास शाल घातली. खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चंदनाचा हार घातला. त्याचप्रमाणे पाटबंधारे व बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पंतप्रधानांना म्हैसुरी पगडी घातली. धर्मादाय हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांनी श्री यल्लमा देवीची प्रतिमा, तर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पंतप्रधानांना त्यांचेच तैलचित्र भेटी दाखल दिले. पंतप्रधानांच्या सत्कारानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमरजी यांनी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची थोडक्यात माहिती दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका मातीच्या भांड्यात कडधान्य बिजारोपण करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी याप्रसंगी समयोचित विचार मांडले. जाहीर सभेला अवघा जनसागर लोटला होता.
Belgaum Varta Belgaum Varta