बेळगाव : तीन मुलींसह फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न 40 वर्षीय महिलेने केला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तिने मुलींना फिनेल पाजविले आणि नंतर स्वतःही फिनेल प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
फिनेल पिऊन अत्यवस्थ झालेल्या या चौघांना तात्काळ बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मूळची बैलहोंगल तालुक्यातील जनता प्लॉट, मुरगोड येथील ही महिला सध्या अनगोळ येथे आपल्या लहान मुलींसाठी भाडोत्री घरात राहते. सरस्वती असे त्या महिलेचे नाव असल्याचे समजते. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या सरस्वतीचा पती अदृश्यप्पा याने इकडून तिकडून कर्जाची उचल केली होती. कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाल्याने तो बायको आणि मुलींना टाकून गाव सोडून पळाला.
मात्र कर्ज दिलेल्यानी सरस्वतीकडे कर्ज भरणीसाठी तगादा लावला होता. आर्थिक परिस्थिती खूपच बिकट. त्यातच नवरा बेपत्ता. अशातून आपल्या तीन लहान मुलींची पोटं भरणे सरस्वतीला कठीण जात होते. अशात ती नवऱ्याने काढलेले कर्ज भरणार कोठून? कर्ज मागण्यासाठी लोकांचे घरी येणे सुरूच होते. यामुळे ती पिडली होती.
आज तिने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपल्या 14 वर्षीय सृष्टी, 8 वर्षीय साक्षी आणि 3 वर्षीय सानवी या मुलींना शरबत असल्याचे सांगून फिनेल पाजविले आणि तिने स्वतःही ते प्राशन केले. फिनेल प्राशन केल्यानंतर मुलींनी उलट्या केल्या. यावेळी तेथील कर्मचाऱ्यानी विचारणा केली असता आईने शरबत म्हणून काहीतरी पाजविल्याचे मुलींनी सांगितले.
येथील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पाहून 40 वर्षीय सरस्वतीसह तीन मुलींना तत्काळ जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.
Belgaum Varta Belgaum Varta