Saturday , July 27 2024
Breaking News

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमावासीयांनी पाळला काळादिन!

Spread the love

बेळगाव : गेली ६५ वर्षे सीमाभागातील मराठी लोक संयुक्त महाराष्ट्र पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. भाषावार प्रांतरचना करतेवेळी मुंबई प्रांतातातील चार जिल्हे हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामुळे लाखो मराठी लोकांना इच्छेविरुद्ध तत्कालीन म्हैसूर राज्यात जावे लागले. तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५६ जेव्हा राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. तेव्हापासून १ नोव्हेंबर हा दिवस सीमावासीय लोक काळा दिन म्हणून पाळतात. केंद्र सरकारच्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी गेली ६५ वर्षे या दिवशी सीमा भागातील मराठी लोक एकत्र येऊन निषेध मोर्चा काढून आपला निषेध नोंदवत आले आहेत. पण गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे प्रशासनाने निषेध मोर्चा काढण्यास विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला निषेध नोंदविण्यासाठी धरणे आंदोलनाचे नियोजन केले होते. त्याला देखील बहुसंख्य मराठी लोकांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला आहे.
बेळगावच्या मराठा मंदिर येथे झालेल्या निषेध सभेत सीमाभागातील लोकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र सरकारने हा प्रश्न त्वरित सोडवावा तसेच कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी लोकांवर करत असणारे अन्याय त्वरित थांबवावे असे मत व्यक्त केले. त्या सोबत महाराष्ट्रातील नेत्यांनी आता हा प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे व सीमाभागातील आंदोलनात प्रत्यक्ष सीमाभागात येऊन सहभाग घेतला पाहिजे कारण हा प्रश्न फक्त सीमावासियांचा नसून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण -पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की छ. शिवाजी महाराजांचे खरं हिंदुत्व जे आहे ते महाराष्ट्र एकीकरण समितीने जपले आहे. बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज काढून राष्ट्रीय पक्षांनी आपला भगवा द्वेष दाखवून दिला आहे. तेंव्हा युवापिढीने राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी रहावे.
मनपावर भगवा फडकवून दाखवा : सरिता पाटील
सभेमध्ये बोलताना माजी महापौर सरिता पाटील यांनी बेळगाव महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा संदर्भ घेऊन स्वतःला हिंदू म्हणवून घेत असाल तर महापालिकेवर भगवा फडकवून दाखवा, असे उघड आव्हान दिले. सीमाप्रश्नासाठी चाललेला हा लढा आमच्या अस्तित्वाचा लढा असून या लढ्यात आम्हाला जितक्या वेदना द्या तितके आम्ही पेटून उठू, असे सरिता पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्याची परिस्थिती गंभीर असली तरी मराठी युवक लढ्यासाठी खंबीर आहे असे सांगून प्रशासनाची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी दिला.
म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी यावेळी बोलताना न्यायालयीन लढा सोबतच आता रस्त्यावरील लढाई गरजेची असल्याचे सांगितले. न्याय हक्काने किंवा लोकशाही मार्गाने चाललेल्या सीमाप्रश्नाच्या लढ्यात कर्नाटकी प्रशासन हेतुपुरस्सर आडकाठी आणून मराठी युवकांना अकारण भडकवण्याचा आणि त्यांच्यावर खटले दाखल करून कचाट्यात अडकवण्याचा डाव आखत आहे. मात्र कर्नाटक प्रशासनाने लक्षात ठेवावे की सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही प्रत्येक जण जीव देण्यासाठीही तयार आहोत, असेही किल्लेकर म्हणाल्या.

कोरोनाचे कारण पुढे करत परवानगी नाकारली आणि दुसरीकडे शेकडो कन्नड लोकांनी बेळगावच्या चन्नम्मा चौकात जमून कर्नाटक राज्योत्सव साजरा केला. यावेळी कर्नाटक प्रशासनाचा दुटप्पीपणा समोर आला. मराठी लोकांना दडपण्याची एकही संधी कर्नाटक सरकार सोडत नाही. पण शेकडो मराठी लोकांनी पोलिसांचा विरोध झुगारून निषेध सभेत सहभागी नोंदवला.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडविला पाहिजे अशी भावना सीमाभागातील प्रत्येक मराठी माणूस व्यक्त करीत आहे. अगदी पहिल्या आंदोलनात असणाऱ्या वृद्ध लोकांपासून ते अगदी कोवळ्या वयातील मराठी लेकरं सुद्धा या लढ्यात सहभागी होती.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *