
बेळगाव : विकासाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमीन ओरबडून घेण्यात येत आहेत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगे बांधून, त्यावर प्रगतीचे मनोरे रचण्यात राज्यकर्ते गुंतले आहेत. या विरोधात शेतकऱ्यांनी संघटित संघर्ष उभा केला पाहिजे. संघटित संघर्षातूनच बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर आलेले भूसंपादनाचे संकट टळेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
बेळगुंदी येथील शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवारी तालुका म. ए. समितीने शेतकरी मेळाव्याचे आणि कलमेश्वर युवक व्यायाम मंडळाने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी म.ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते.
यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कोंडीत पकडून त्यांना बेदखल करण्यात येत आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली भूसंपादन करण्याचा धडाका सरकारने लावला आहे. यातून भूमिपुत्र देशोधडीला लागत आहेत. अनेक वर्ष सांभाळलेल्या मालमत्तेतून भूमिपुत्राला ज्यावेळी बेदखल केले जाते. त्यावेळी त्यांची भावना काय होते. याचा विचार राजकर्त्यांनी करावा. बेळगावची लाल माती सुपीक आहे. येथील उसाला अधिक उतारा येतो. परंतु दर मात्र महाराष्ट्र पेक्षा 300 ते 500 रुपये कमी मिळतो. वजनात पाप केले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते. या विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta