बेळगाव : बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, बामणवाडी गावातील रोजगाराचे (मनरेगा) काम मागणाऱ्या महिलांची ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे किणये पंचायतविरूध्द तक्रार –
किणये ग्रामपंचायतीमधील बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी व बामणवाडी गावातील मनरेगा कामगारांना पंचायतीमार्फत वर्षाला 100 दिवस गेल्या कित्येक वर्षांपासून कधीच रोजगाराचे काम मिळालेले नाही. येथील काही महिलांनी आपल्याला रोजगाराचे काम मिळावे म्हणून किणये ग्रामपंचायतीच्या कित्येक वेळा खेटा मारल्या, पण गरीब कष्टकरी महिलांच्या समस्या ऐकायला किणये पंचायतीकडे वेळचं नाही. पंचायतीमधून काही गावातील महिलांना जाॅबकार्ड मिळावे म्हणून 2 वर्षे वाट बघावी लागली, या गावांतून वर्षातून मोजकेच दिवस आणि तेही मोजक्याच कामगारांना काम मिळत असे. संपूर्ण गावकऱ्यांना कधीच एकत्रित मनरेगा कायद्यानुसार योग्य प्रकारे काम मिळालेले नाही, त्यामुळे पंचायतीच्या वेळकाढू कृतीला कंटाळून येथील रोजगाराला जाऊ इच्छिणाऱ्या गरीब कष्टकरी महिलांनी ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या कानावर आपल्या समस्या घातल्या, त्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गरज लागेल तेव्हा येथील गावागावात जाऊन बैठका घेऊन महिलांना मनरेगा कायद्याची माहिती दिली व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महिला आत्ता थोडेतरी रोजगाराचे काम मिळवत आहेत. अजूनही काही महिलांना मागे केलेल्या कामाची मजुरी मिळालेली नाही, यासंदर्भात व पुढील वर्षात (2023-2024) आपल्याला योग्य प्रकारे काम मिळावे म्हणून ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ माध्यमातून तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेतली व कामगारांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी आलेल्या महिलांकडून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाड यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मजदूर नवनिर्माण संघाचे बहाद्दुरवाडी, जानेवाडी, कर्ले व बामणवाडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta