गणेश महोत्सव 2021 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
बेळगाव : स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळतो. यासाठी विविध संघ-संस्थांच्यावतीने आयोजित स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांनी आपल्या अंगभूत कलेला वाव द्यावा असे कर्नाटक राज्य सौहार्द सरकारी फेडरेशनचे संचालक लक्ष्मण पवार म्हणाले. विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव आयोजित गणेश महोत्सव- 2021 स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नवजीवन हॉस्पिटल बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश चौळीगार हेदेखील पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गणेश चतुर्थी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी गणेश भक्तांसाठी गणेश महोत्सव – 2021 अंतर्गत उत्कृष्ट घरगुती गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना लक्ष्मण पवार यांनी, स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचा गौरव करीत युवा नेतृत्व किरण जाधव हे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत हे प्रशंसनीय असल्याचे म्हटले.
स्पर्धा आयोजक किरण जाधव यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून गणेशभक्तांच्या कलेला वाव देणे हा या स्पर्धेमागचा उद्देश होता, असे सांगितले. सेवाभावी कार्याबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन करून स्पर्धकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे असेही किरण जाधव म्हणाले.
डॉ. सतीश चौळीगार यांनीही किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.
या स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण अशा तीन विभागात ठेवण्यात आल्या होत्या. बेळगाव दक्षिणमध्ये बाळकृष्ण काटकर, अखिलेश कोकितकर, सागर हुंदरे आणि रुत्वी घोलसे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळविला. बेळगाव विभागात वैभव बडमंजी, अमोल पुजारी, अथर्व जाधव व हरीश घोरपडे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला. तर बेळगाव ग्रामीण विभागात अक्षय बाळेकुंद्री, विनोद मेणसे, पुनम रेडेकर व मारुती डोणकरी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळविला.
पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला अन्य मान्यवर व गणेशभक्त उपस्थित होते.