
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयाला भेट देत स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या जागेची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या आवारातील विविध इमारतींची पाहणी करून मागील निवडणुकीत केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच याबाबत सर्वंकष ब्ल्यू प्रिंट तयार करून निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर कामे सुरू करावीत, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. केवळ सुरक्षेबाबतच नव्हे तर वाहतुकीला अडथळा न होता पार्किंग आणि अन्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता भीमा नायक यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारण्याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, उपविभागीय अधिकारी बलराम चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta