बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समर्थकांच्या तोबा गर्दीत, झांज पथकाच्या निनादात मिरवणुकीने आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला अर्ज दाखल केला.
सजविलेल्या रथातून निघालेल्या हेब्बाळकर यांनी, मिरवणूक मार्गावर कित्तूर राणी चन्नम्मा चौकात राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “राणी चन्नम्मा की जय”, “वीर संगोळी रायन्ना की जय” अशी जोरदार घोषणाबाजी केली.
लक्ष्मी आक्का तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि भगवा ध्वज हाती घेऊन त्यांचे समर्थक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, मागील पाच वर्षांचा आपल्या आमदारकीच्या काळातील विकास कामांचा लेखाजोखा आपल्या मांडला. आपली बहीण, आपली मुलगी, लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी लाखाहून अधिक मते घेऊन ग्रामीणमधून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करीत आपल्यासोबत अर्ज भरण्यासाठी उपस्थित समर्थकांची गर्दीच आपल्या विजयाची पोचपावती असल्याचे यावेळी बोलताना म्हणाल्या.
भारदस्त असा भगवा फेटा परिधान करून आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, माजी मंत्री सतीश जारकीहोळी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Belgaum Varta Belgaum Varta