
रमाकांत कोंडुसकरांची नानावाडी, टिळकवाडीत पदयात्रा
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. ४) नानावाडी, टिळकवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. नानावाडी येथून पदयात्रा सुरू झाली. प्रारंभी श्री. कोंडुसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नानावाडी परिसर फिरुन मराठा कॉलनी, विवेकानंदनगर, शिवाजी कॉलनी, सावरकर रोड, पापामळा, गजानननगर, शांतीनगर, चौगुलेवाडी, अयोध्यानगर आदी भागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. गोडसेवाडी येथे पदयात्रेची सांगता झाली.
माजी नगरसेवक पंढरी परब म्हणाले, “२०१४ ते २०१९ मध्ये महापालिकेत अनेक विकासकामे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात आहे. पारदर्शकपणे विकास होण्यासाठी समितीचा विजय होणे आवश्यक आहे.” पदयात्रेत माजी नगरसेवक अनंत देशपांडे, कुसुम टपाले, दयानंद कारेकर, शिवाजी हंडे, बाळू फगरे, मारुती भोगण, सुरेश जाधव, चंद्रकांत गुंडकल, मोहन पाटील, उदय सावंत, रवी सावंत यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, श्री. कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ धामणे येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री ८ वाजता सभा होणार आहे. बसवाण गल्ली, धामणे येथे होणाऱ्या या सभेला माजी नगरसेवक नेताजी जाधव, गुणवंत पाटील व प्रा. आनंद आपटेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता मराठा मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. मराठा मंदिर परिसर फिरून न्यू गुड्सशेड रोडमार्गे गोकुळनगर, गोडसेनगर परिसर पदयात्रा होईल.
Belgaum Varta Belgaum Varta