
बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुलबत्ते कॉलनी परिसरात आढळून आलेल्या कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. या कामी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल व श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असून कोल्ह्याने चावा घेतल्याने एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.
हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी एक कोल्हा वावरताना दिसून आला होता. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हुलबत्ते कॉलनीत दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली. वन खात्याच्या या मोहिमेमध्ये फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. कोल्ह्याला पकडते वेळी त्याने चावा घेतल्यामुळे रोहन शहापूरकर हा कार्यकर्ता मात्र किरकोळ जखमी झाला आहे. जेरबंद केलेल्या कोल्ह्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन खात्याच्या अधिकारी स्वतः सोबत घेऊन गेले आहेत. वनखात्याच्या कोल्ह्याला पकडण्याच्या मोहिमेत संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, नारू निलजकर आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta