
उमेश देसाई; गणेश दुध संकलन केंद्राचा वर्धापन दिन
बेळगाव : गेल्या नऊ वर्षांत दुधाला इतरांपेक्षा अधिक दर देऊन शेतकऱ्यांचे शेतकरी दूध हित जपले आहे. शेतकरी विक्री करताना कोणता हिशेब ठेवत नसल्याने फसवणूक होते. गणेश दूधने मात्र पारदर्शक व्यवहार ठेवला असून उत्पादकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध पुरवठा वाढवला तर त्यांचाच नफा वाढेल, असे प्रतिपादन गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश ऊर्फ प्रवीण देसाई यांनी केले.

उचगावजवळ बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राच्या नवव्या वर्धापन दिन कार्यक्रमात देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश दुध केंद्राचे संस्थापक मोतीराम देसाई होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उमेश देसाई म्हणाले, गणेश दूधच्या पदार्थांना महाराष्ट्रात मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांनी दूध पुरवठा वाढवणे आवश्यक आहे. दूध टंचाईमुळे उपपदार्थ निर्मितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी असल्यास केंद्राशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना आता खरे आणि खोटे यातील सत्य शोधण्याची वेळ आल्याचे सांगून दुग्ध व्यवसायात आलेले विविध अनुभव त्यांनी सांगितले.

उद्योजक मधू बेळगावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाचे स्थानिक पातळीवर कसे सोने करायचे हे ‘गणेश दूध’ दाखवून देत आहे. पदार्थ निर्मितीमुळे त्यांना जादा दर देणे शक्य होते. शेतकऱ्यांनी विश्वासाचे नाते जपल्यास त्यांना लाभ होईल.
सुळगा ग्रा.पं. सदस्य अनिल पाटील, माजी ग्रा.पं. अध्यक्षा योगिता देसाई, मल्लापा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संचालिका अरुंधती देसाई, लक्ष्मण कामटी, चंद्रकांत बेळगावकर, शिवाजी कोवाडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला व्यवस्थापक किरण देसाई, डी. बी. पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, वितरक व गावकरी उपस्थित होते. सरव्यवस्थापक सुधाकर करटे यांनी आभार मानले.
उत्कृष्ट सेवेचा गौरव
गणेश दूध केंद्राला दूध पुरवठा करणाऱ्या विविध संस्थांमधील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सचिवांचा मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा, शाल व पुष्प देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण धुडूम (अलतगा), मल्लाप्पा पाटील (हंदिगनूर), बबन पाटील (नावगे), राजाराम पाटील (बडस) यांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta