बेळगाव (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणूक निकालाची क्षणगणांना सुरू झाल्याने निकालाचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले दिसताहे. बेळगांव जिल्ह्यातून दोघे उमेदवार विधानपरिषद सदस्य म्हणून नव्याने निवडले जाणार आहेत. ही संधी कोणाला मिळणार याविषयी जो-तो आपआपला अंदाज वर्तविताना दिसत आहे. बेळगांव जिल्ह्यत भाजपाचे 13 आमदार त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एक राज्यसभा सदस्य आणि सर्वाधिक ग्रामपंचायत भाजपाच्या असल्याने भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ प्राधान्य मतांनी विजयी होण्याची एकीकडे शक्यता वर्तवली जात असली तरी भाजपाच्या आमदारांनीच महांतेश यांना पराजित करण्याचा चंग बांधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे कवटगीमठ यांच्या विजयापेक्षा पराजयाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बेळगांव जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही आमदारांनी चन्रराज हट्टीहोळी यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना कांहीं भाजपाच्या आमदारांचा छुपा पाठिंबा दिल्याची गोष्ट जगजाहीर झाली आहे. त्यामुळे चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित समजला जात आहे. निवडणुकीत भाजपा-काँग्रेसच्या भांडणाचा लाभ अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी उठविणेचा पद्धतशीरपणे केलेला प्रयोग यशस्वी ठरल्याने लखन यांचा विजय शंभर टक्के नक्की समजला जात आहे. बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत सहा जण निवडणूक रिंगणात असले तरी सामना तिरंगी अत्यंत चुरशीने झाला आहे. यामध्ये दोघे विधानपरिषद सदस्य होणार आहेत. विजयी उमेदवार कोण? याचा निकाल आता लवकरच लागणार आहे. तोपर्यंतचा अंदाज अपना-अपना असा राहिला आहे. कोण म्हणतयं काँग्रेस-अपक्ष उमेदवार विजयी होणार तर कोणी सांगितलं भाजप-काँग्रेस उमेदवाराचा विजय नक्की आहे. कांहीजण असेही सांगताहेत भाजप-अपक्ष विजयी होणार.
