Saturday , July 27 2024
Breaking News

हरगापूर गडाचे नामकरण ‘वल्लभगड’ करण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : हरगापूर गडाचे नांव तात्काळ बदलून ‘वल्लभगड’ असे करण्यात यावे, अशी मागणी हुक्केरी तालुक्यातील हरगापूर गडावरील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज सकाळी मोठ्या संख्येने आलेल्या हरगापूर गडावरील नागरिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. हरगापूर ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या गडावरील गावाची सरकार दप्तरी हरगापूरगड म्हणून नोंद केली जाते. तथापि पूर्वजांपासून आमच्या गावाचे नांव आम्ही ‘वल्लभगड’ असे सांगत आलो आहोत.

त्याचप्रमाणे आमच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याचे नांव देखील वल्लभगड असे असल्यामुळे हरगापूरगड हे नांव बदलून आमच्या गावाचे नांव वल्लभगड केले जावे, अशी आम्ही तुमच्या मार्फत सरकारला विनंती करत आहोत. यापूर्वी यासंदर्भात ग्रामपंचायतमध्ये ठरावही झाला आहे.

त्याचप्रमाणे तहसीलदारांसह मंत्री, आमदार यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे वल्लभगड नामकरणाची मागणी करण्यात आली आहे. या पद्धतीने अनेक वर्षापासून वारंवार मागणी करूनही आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तरी आपण हरगापूरगड गावाचे नांव तात्काळ बदलून वल्लभगड करण्याची शिफारस सरकारकडे करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हरगापूरगड गावातील रहिवासी प्रकाश मगदूम म्हणाले की, हरगापूर गडाचे नांव बदलून वल्लभगड असे करण्याची मागणी आम्ही 2012 मध्ये देखील केली होती. मात्र आजतागायत आमच्या मागणीप्रमाणे गावाचे नांव बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे आज पुन्हा आम्ही निवेदन देण्यास आलो आहोत.

यावेळी जर आमची मागणी मान्य करून दाखवा तात्काळ कार्यवाही केली गेली नाही. तर सरकारच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊन मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आमच्या गावाचे नाव वल्लभगड असे बदलण्यात आलेच पाहिजे. याप्रसंगी पवन पाटील, आनंद शिंदे, रवींद्र शेलार, शुभंकर माने, विजय शेलार आदींसह बरेच हरगापूरगडवासीय उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *