मंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : शासनाने राज्यातील महत्त्वाच्या प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याची योजना आखली आहे. पीपीपी पद्धती नुसार हाती घेण्यात येणाऱ्या योजनांद्वारे पर्यटन स्थळांचा विकास करताना, सौंदत्ती रेणुका मंदिर परिसरातही विकासाची कामे त्याचबरोबर केबल कार प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन विकास मंत्री एच. के. पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली.
आज मंगळवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांनी मांडलेल्या प्रश्नांला उत्तर देताना एचके पाटील म्हणाले, शासनाने राज्यातील महत्त्वाच्या पुरातन प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती घेऊन एक विशेष योजना हाती घेतले आहे. धार्मिक, सांस्कृतिक, साहसी, कृषी,पारंपरिक अशा 26 प्रकारच्या पर्यटन प्रकल्पांकडे शासनाने विशेष लक्ष दिले आहे. या योजनेअंतर्गत खाजगी ठेकेदारांना पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पीपीपी पद्धतीवर काम देण्यात येणार आहे. राज्यातील उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानाला वर्षभरात तब्बल 20 लाख भाविक भेट देत असतात. याकडे लक्ष दिल्यास रेणुका डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्याची मोठी संधी आहे.या ठिकाणी केबल कारचा प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याची माहिती एच. के. पाटील यांनी सभागृहाला दिली.