दळवी यांच्या जन्मदिनी युवा कार्यकर्त्यांनी घेतली भेट, दिल्या शुभेच्छा आणि घेतले आशीर्वाद
बेळगाव : दि. ७ डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांचा ८२ वा वाढदिवस, याचे औचित्य साधून समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या तसेच आशीर्वादही घेतले, गेल्या वर्षभरापासून दळवी आपल्या तब्येतीच्या कारणास्तव घरीच आहेत, या ही परिस्थितीत मागीलवर्षी १ नोव्हेंबर २०२२ रोजी काळ्यादिनी सहभाग दर्शवून मराठा मंदिर येथील निषेध सभेला संबोधित केले होते, मधल्या काही आंदोलन मोर्चामध्येही आपल्या तब्येतीची हयगय न करता खास करून मुंबईमधील आंदोलना मध्येसहभाग दर्शविला होता.
यावेळी दीपक दळवी यांनी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, निवडणूक हा लढ्याचा फक्त एक भाग आहे तर मूळ लढा हा आपल्या सीमाप्रश्नाची सोडवणूक, मराठी अस्मिता हा आहे, सीमाभागात मराठीची होणारी गळचेपी यासाठी लढा उभारून सतत त्याचा पाठपुरावा करून तो लढा तडीस नेण्यासाठी आपण युवा कार्यकर्त्यांनी नाराज न होता समितीचे कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असे सांगितले, माझी जरी अडचण झालेली असली तरीही माझ्या डोक्यात सतत या विचाराने नवीन कल्पना सुचत असतात. तब्येतीची या अडचणींवर मात करून मी सक्रिय होण्याचा प्रयत्न करेन तो पर्यंत आपण सर्वांनी या लढ्याला पाठबळ द्यावे व हा सीमालढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे विचार मांडले, तर मध्यवर्तीचे सन्माननीय अध्यक्ष दीपक दळवी साहेब हे आम्हा सीमावासीयांचे सीमालढ्यातील प्रेरणा आणि उर्जा स्तोत्र असून आम्ही त्यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अविरत कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांच्या जन्मदिनी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.
यावेळी समितीचे युवा कार्यकर्ते किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे, पत्रकार शेखर पाटील, सुहास हुद्दार इतरांनी भेट घेऊन दळवी यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले.