बेळगाव (वार्ता) : आनंदवाडी येथील घरे ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने प्रयत्न केले होते. मात्र याविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारचा प्रयत्न यापुढे होऊ नये आणि येथील रहिवाशांना बेघर व्हावे लागू नये. यासाठी आता हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्याशी चर्चा करण्यात आली. आनंदवाडी येथील रहिवासी संघटनेच्यावतीने त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती देण्यात आली. आनंदवाडी येथील रहिवासी असणारे पवन धोंगडी, सोमनाथ रंगरेज, मारुती भोसले, अनिल कुरणकर, शशिकांत रणदिवे, सचिन पवार, नगरसेवक नितीन जाधव आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता. तसेच आमदार अभय पाटील आणि अनिल बेनके यावेळी उपस्थित होते.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही आनंदवाडी येथील नागरिकांना दिली आहे. त्यानुसार आता याबाबत विधानसभेत चर्चा अपेक्षित आहे. आनंदवाडी येथील घरांचा आणि जागांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्या वक्फ बोर्डाला न्यायालयाने यापूर्वी दणका दिला आहे.
