बेळगाव : पोलीस संरक्षणात काही कन्नड संघटना मराठी भाषिकांवर अन्याय करत आहेत. पोलीस संरक्षण बाजूला काढले तर त्यांची ही हिंमत होणार नाही. त्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा नाद करू नये असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिला.
मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कासाठी सीमालढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना बेळगावातील किर्लोस्कर रोडवर हुतात्मा स्मारकात आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, एखाद्याला कन्नड वाढवण्याचे काम करायचे असेल तर त्यांनी ते जरूर करावे. पण म्हणून सीमाभागातील, बेळगावातील मराठी पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही पोलिस प्रशासनालाही सांगितले आहे की, केवळ तुमच्या संरक्षणात कन्नड संघटना मराठी माणसाला डिवचण्याचे काम करत आहेत. तुम्ही तुमचं संरक्षण बाजूला करा, या लोकांची हिंमतही होणार नाही. प्रशासनालासुद्धा आमची विनंती आहे की, कोणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून त्यांची बाजू घ्यायची अन एका फार मोठ्या जनसमुदायावर अन्याय करायचा ही वृत्ती सोडून द्या असे त्यांनी ठणकावले.
अष्टेकर पुढे म्हणाले की, कर्नाटक सरकारने किंवा कानडी संघटनांनी सीमाभागातील मराठी माणसावर सुरु ठेवल्यास त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटू शकते हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी माणसासाठी सुरु केलेल्या आरोग्य योजनांना आडकाठी आणली तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातही उमटली तर त्याला कर्नाटक सरकार व येथील प्रशासन जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव मंगेश चिवटे यांनी दिला आहे. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्याचे काय होईल हे पाहतानाच मराठी भाषिक सीमावासियांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात तन, मन, धनाने सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याची आपली प्रखर इच्छा दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन अष्टेकर यांनी केले.
प्रारंभी मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर १७ जानेवारी १९५६ च्या पहिल्या व आजवरच्या सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रमापूर्वी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, अनुसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकापर्यंत मूक फेरी काढण्यात आली.
यावेळी रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, मदन बामणे, शिवानी पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मधूश्री पुजारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शहरप्रमुख बंडू केरवाडकर, माजी महापौर सरिता पाटील, महेश नाईक, ऍड. राजाभाऊ पाटील, बी. ओ. येतोजी, अप्पासाहेब गुरव, अंकुश केसरकर, अमर येळ्ळूरकर, महेश जुवेकर, पंढरी परब, मनोहर हलगेकर, सुधा भातकांडे, शिवाजी बोकडे, सतीश पाटील, शेखर पाटील, दत्ता जाधव, प्रकाश अष्टेकर, चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, उमेश पाटील, किरण हुद्दार, सागर पाटील, शिवाजी हावळानाचे, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे बाबू कोले, श्रीधर खनुकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.