
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा कपिलेश्वर उड्डाणपूल येथे उभारण्यात आलेला मराठी भाषेतील फलक महापालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवला.
22 जानेवारी रोजी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कपिलेश्वर उड्डाणपूलाशेजारी मराठी भाषेतील शुभेच्छा फलक उभारला होता.
मोक्याच्या ठिकाणी उभारेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून होता. इतर राजकीय पक्षांचे फलक त्यासमोर फिके पडत होते. त्यामुळे कन्नड संघटनांनी फलकावर केवळ मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे, असा कांगावा केला. परिणामी महापालिकेने हा फलक पोलिस बंदोबस्तात हटवला आहे. या मनपाच्या कारवाईमुळे मराठी भाषिक जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राम मंदिर उद्घाटनानिमित्त म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी 22 जानेवारी रोजी बाईक रॅली आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांनी आणि सागर पाटील आणि कपिल भोसले यांनी कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारी मोठा शुभेच्छा फलक उभारला होता. हा फलक कन्नड संघटनांच्या डोळ्यात खुपल्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. आज महापालिकेच्या अधिकार्यांनी पोलिस बंदोबस्तात हा फलक हटवला.
महापालिकेकडून काही दिवसांपासून शहरातील दुकानांवर 60 टक्के कन्नड भाषेत फलक लावण्यात यावेत, अन्यथा व्यापार परवाना रद्द करण्यात येईल, दुकानाला टाळे ठोकण्यात येईल, अशी नोटीस देण्यात येत आहे. शहरातील इतर भाषेतील फलक कन्नड आता म. ए. समितीच्या फलकांवर प्रशासनाची नजर पडली असून रमाकांत कोंडुसकर यांनी लावलेला फलक काढण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta