Thursday , September 19 2024
Breaking News

येळ्ळूरमध्ये उद्या 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : चार सत्रात आयोजन, पुरस्काराचेही वितरण

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार (कोल्हापूर) आपले अध्यक्षीय भाषण करणार असून दुसऱ्या सत्रात समाजसेविका व रमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या ज्योती पठाणिया (पुणे) आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच या सत्रात वसंत हंकारे (सातारा) यांचा पुन्हा जगुया आनंदाने हा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
चौथ्या सत्रात सातारा येथील तानाजी कुंभार व सहकाऱ्यांचे विनोदातून समाज प्रबोधन करणारे भारुड सादर करणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन टिळकवाडी येथील हॉटेल उदय भवनचे मालक सूर्यकांत केशव शानभाग यांच्या हस्ते होणार आहे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील हे असणार आहेत. रविवारी सकाळी 8:30 वाजता ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. संमेलन नगरीचे उद्घाटन माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तर दिवंगत सीमा सत्याग्रही केदारी नागोजी गोरल प्रवेशद्वाराचे उद्घाटन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा बिजगरकर यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत राजा शिरगुप्पे ग्रंथ दालनाचे उद्घाटन उद्योजक श्रवणकुमार हेगडे यांच्या हस्ते होणार आहे, स्वामी विवेकानंद सोसायटी सभामंडपाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील यांच्या हस्ते होणार आहे, स्वामी विवेकानंद विचार पिठाचे उद्घाटन ॲड. सागर खन्नूकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाला उपस्थित साहित्य रसिकांना प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रा. यल्लोजीराव निंगोजीराव मेणसे (येळळूर) यांच्याकडून, नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येळ्ळूर या ठिकाणी अल्पोपहार देण्यात येणार आहे.

श्रीराम पवार (संमेलनाध्यक्ष)

ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचे शिक्षण बी. एससी (इलेक्ट्रॉनिक्स), एम. जे. सी., एम. ए. (राज्यशास्त्र) असे झाले आहे. पत्रकारितेत गेली 30 वर्षे विविध पदांवर कार्यरत होते. दैनिक सकाळ माध्यमाचे प्रमुख संपादक म्हणून निवृत्त झाले आहेत. लेखक/स्तंभलेखक/टीव्ही पॅनेलिस्ट: सतत राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लेखन.
पॉवर पॉइंट आणि करंट अंडरकरंट हे लोकप्रिय स्तंभ आहेत, राजकारणावरील प्राइम टाइम टीव्ही चर्चेमध्ये नियमित सहभाग असतो. काश्मीर प्रश्न, ईशान्येकडील राज्यांतील अशांतता, प्रादेशिक राजकारण, अस्मिता आणि जातीचे राजकारण, बहुसंख्याकवादी राजकारण तसेच जागतिक दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यावर सातत्याने लेखन.
निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर विविध ओपिनियन पोल आणि राजकीय सर्वेक्षणांचा प्रदीर्घ अनुभव आहे. संयुक्त राष्ट्र आमसभा /जी २० परिषदेसाठी पंतप्रधानांच्या अमेरिका, फ्रान्स, जर्मनी दौर्‍यासह मीडिया शिष्टमंडळात भाग घेतला होता. समकालीन राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अनेक पुस्तके लिहिलीकाही पुस्तके पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडली आहेत
पत्रकारितेतील असाधारण योगदानासाठी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, डेक्कन इंडिया जैन सभेचा पुरस्कार कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोल्हापूर भूषण, व्हाॅइस ऑफ मिडियाचा मीडियाचा आवाज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सूर्यकांत केशव शानभाग (उदघाटक)

हे या साहित्य संमेलनाचे उदघाटक असून आरपीडी क्रॉस येथील हॉटेल उदय भवन चे मालकआहेत. हे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आहेत शिवाय सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. गेल्या 69 वर्षापासून ते हॉटेल व्यवसाय उत्तमरीत्या चालवित आहेत. ते हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष आहेत. ते उत्तम वक्ते सुद्धा आहेत.

प्रमोद पुंडलीक पाटील (स्वागताध्यक्ष)

हे येळ्ळूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपाध्यक्ष असून ते प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते आहेत. गावातील प्रत्येक सार्वजनिक कामात त्यांचा सहभाग असतो. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदत करत असतात. ते उदार देणगीदार आहेत. येळ्ळूर गावच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात सतत त्यांचा सहभाग असतो.

वसंत बाबुराव हंकारे (युवा व्याख्याते)

समाजपरिवर्तनकार आनंदी जीवनाचे साधक, लाइफ कोच म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे शिक्षण बी. एफ. ए. (भरतनाट्यम्)… नालंदा नृत्य कला महाविद्यालय मुंबई विद्यापीठ. येथून झाले आहे. त्यांनी पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी व पद्मभुषण डॉक्टर कनक रेळे यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले आहेत. संपुर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पाच हजाराहुन अधिक व्याख्याने अभिनयातून शिक्षण या संकल्पनेतून महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. दहा हुन अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. (पुस्तके आनंददायी, शिक्षक आणि अभिनय, याबाळाची व्यथा • पालका तू फक्त एवढच कर • शिक्षका चल उठ आता • युवाशक्ती • आत्मविश्वास • आत्मभान • आत्मप्रतिमा • योद्धा) अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. यशदा आणि रामेती या महाराष्ट्र शासनाच्या प्रशिक्षण संस्थेत अनेक अधिकाऱ्यांना तणावमुक्त आनंदी जीवनाचे प्रशिक्षण त्यांनी दिले आहे.

प्रा. तानाजी कुंभार (भारूडकार)

सांप्रदायिक भारुडकार, समाज प्रबोधनकार, कीर्तनकार तानाजी महाराज कुंभार हे सातारा जिल्ह्यातील मु. पो. जायगांव येथील रहिवासी असून विनोदातून किंवा समाज प्रबोधनातून अध्यात्माकडे नेणारा श्री संत एकनाथ महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम करतात. वारकरी संप्रदायाची 14 वर्षे किर्तन आणि भारुडाच्या माध्यमातून सेवा करीत असून भारुडाचा 14 वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारुडाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. बुरगुंडा होईल तुला ग, रंगीत संगीत विनोदी भारुड यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

ज्योती पठाणीया

ज्योती पठाणीया यांचा जन्म मध्यम कुटुंबात मुंबईमध्ये झाला. त्यांचे शिक्षण बीएससी ॲग्री झाले आहे, 1992 मध्ये त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाज कार्यामध्ये प्रवेश केला. संकटग्रस्त महिलासाठी त्या अधिक सक्रियतेने काम करीत होत्या. 1994 मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्या समवेत चैतन्य महिला मंडळ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला या संस्थेने विस्थापित व पीडित महिला व मुली, मुलांच्या पुनर्वसनाच्या कार्याला वाहून घेतले. त्यांच्या कार्याचे मुख्य स्वरूप हे पीडित महिलांच्या पुनर्वसनाचे, त्यातील मानवी वाहतुकीला बाजारू, शोषणाला बळी पडलेल्या महिलांसाठी कार्य करण्यासाठी आवश्यक सरकारी मान्यता मिळवली. त्यामुळे संस्थेच्या कार्यातील सहभागींची जोखीम कमी झाली, काही मोजक्यात सहकाऱ्यासोबत गेली 25 वर्षे ही संस्था अविरत सुरू आहे. त्यांच्या संस्थेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे, महिला चेतना पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर क्रांतीदूत पुरस्कार, सखी गौरव पुरस्कार, सावरकर पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, जनसेवा पुरस्कार, स्त्री शक्ती गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांच्या चैतन्य महिला मंडळाला मिळाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *