
बेळगाव : मूळचा राजस्थान येथील व सध्या बेळगाव स्थायिक झालेले तरुण कुस्तीपटू यशपालसिंग पनवर यांची राष्ट्रीय कुस्ती कोच व पंच म्हणून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निवड केली आहे. त्यानिमित्ताने मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपाल सिंग पनवर यांचा आज बुधवारी सत्कार करण्यात आला.
शहापूर सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला श्रीराम बिल्डर्सचे मालक आणि दानी व्यक्तिमत्व गोविंद टक्केकर, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, गजानन साबणावर, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशपाल सिंग पनवर याचा फेटा बांधून, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यशपाल सिंगने कमी वयात मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले, त्याचबरोबर भावी कार्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
मूळचा राजस्थान येथील यशपाल सिंग बेळगावात स्थायिक झालेला आहे. त्याला बेळगावचे सुप्रसिद्ध कुस्ती कोच मारुती घाडी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मारुती घाडी, नवरत्न सिंग पनवर, निंगाप्पा कांबळे, बाळाराम पाटील, संतोष होंगल व अन्य मल्ल उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta