बेळगाव : मंडोळी येथील श्री विठ्ठल रखुमाई, श्री कलमेश्वर आणि श्री मारुती मंदिर एकाच जागी संयुक्तिकरित्या होणार आहे. त्यानिमित्त मंडोळी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, माजी महापौर सरीता पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांनी सक्षम बनले पाहिजे असे सांगत असताना त्यांनी सासू सुनेच्या नात्यातील प्रेमाचा धागा उलगडून सांगितला. सासुसूनचे नाते हे मायलेकीच्या नात्याइतकेच घट्ट असले पाहिजेत असे सांगत त्यांनी ‘माहेरची साडी’ या आपल्या चित्रपटातील गाजलेले गीत गायिले आणि उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या गायनाला दाद दिली.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी महिलांच्या आरोग्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. तर माजी महापौर सरिता पाटील बोलताना म्हणाल्या की, महिलांनी हळदीकुंकु समारंभाप्रमाणेच इतर वैद्यकीय शिबीर, व्याख्यानमाला अश्या कार्यक्रमांना देखील उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाहिजे. महिलांनी राजकारणात सक्रीय सहभाग दर्शवला पाहिजे. आज देशाच्या राजकारणात ग्रामपंचायत अध्यक्षापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला विराजमान आहेत. ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. महिलांनी चूल आणि मूल म्हणून न राहता राजकारणात सक्रिय झाल्या तर देश प्रगत होईल असे त्या म्हणाल्या.
उपस्थित पाहुण्यांच्या भाषणानंतर खेळीमेळीत महिलांचा हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या हळदीकुंकू समारंभास मंडोळीसह परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.