बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळीच धर्मवीर संभाजी चौकात समितीचे असंख्य कार्यकर्ते आणि मराठी भाषिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेऊन तालुक्यासह शहर उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण चौक भगवेमय झाला होता.
प्रारंभी धर्मवीर संभाजी चौकात समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर बहुसंख्य समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीला सुरूवात झाली. मराठमोळ्या संस्कृतीनुसार सजविलेल्या बैलगाडीतून महादेव पाटील अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी बैलगाडीतून हात उंचावून महादेव पाटील यांनी जनतेकडे मतयाचना केली. बेळगाव शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्ते व मराठी भाषिकांचा सहभाग असणारी उमेदवार महादेव पाटील यांची ही मराठी अस्मिता दर्शवणारी मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीदरम्यान “हर हर महादेव, बेळगाव -कारवार-निपाणी – बिदर – भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण मार्ग दणाणून सोडला होता.
धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकातून यंदे खूट, कॉलेज रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उमेदवार महादेव पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.