बेळगाव : नोकर भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा संशय आल्याने सलग तीन दिवसापासून चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बेळगावमधील “त्या” बँकेत ठाण मांडून आहेत. सदर प्रकरणी अधिकारी कसून चौकशी करत असून, चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
वरकरणी या आर्थिक संस्थेचा पसारा मोठा होत असताना आतून मात्र कोट्यवधीचा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे. नुकतेच या बँकेच्या नवीन शाखांचे उद्घाटन दणक्यात पार पडले. सीमाभागातील बहुजन समाजाची तारणहार असणाऱ्या या संस्थेत अनेक बहुजन वर्गातील लोकांना नोकरीची संधी मिळू लागली होती. पण त्याच संधीचा फायदा करून घेत एक प्रकारे संस्थेवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचा हा विश्वासघात नव्हे का?
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सदर संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नोकर भरती प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती समोर येत आहे. आपण खूप “पावर”फुल आहोत हे सिद्ध करण्यासाठी अहंकाराच्या आहारी गेल्याने बँकेलाच अडचणीत टाकले आहे.. हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबला नसून यात एक माजी नगरसेवक व ज्येष्ठ संचालक देखील सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या नोकर भरती घोटाळ्यात अध्यक्षांसोंबत या दोघांचा देखील सहभाग असल्याने प्रकरणाला आता नवीन कोणती कलाटणी मिळते ते पाहावे लागेल….
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या महिला उपाध्यक्षांचा मानसिक छळ केला जात आहे.
(क्रमशः)