जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची ईव्हीएम मशीन व साधनसामग्री वितरण केंद्राला भेट
बेळगाव : कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटकातील १४ जिल्ह्यात उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. दरम्यान निवडणुकीसाठी ४५२४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत व्यवस्थित पार पडण्यासाठी ३४ हजार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये २४ हजार कर्मचारी आणि दहा हजार हे पोलीस व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत तर चिकोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये १८ उमेदवार आहेत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ४१ लाख ५ हजार २२५ मतदार आहेत बेळगावला १९ लाख २३ हजार ७८८ मतदार असून, चिकोडी मतदारसंघांमध्ये १७ लाख ६१ हजार, ६९४ मतदार आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर व कित्तूर मतदारसंघ जोडले आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून चार लाख १९ हजार ७४३ मतदार आहेत.
निवडणूक कामासाठी परिवहन मंडळाकडून १५२४ बसेस निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या देखरेखीखाली उद्याच्या मतदानासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रणा पाठविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात येत आहे.