महिला संघटनांची मागणी
बेळगाव (वार्ता) : बेळगावात घडलेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी काही निष्पापांना अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करावी या मागणीचे निवेदन बेळगावात बुधवारी महिला संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
बेंगळुरात अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेनंतर या घटनेचा बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध करण्यात आला. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक करून हिंडलगा तुरुंगात ठेवले आहे. यातील अनेकजण निर्दोष आहेत. त्यातील काहीजण विद्यार्थी असून त्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. त्यामुळे त्यांची विनाविलंब सुटका करावी अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या संदर्भात बोलताना विद्या यांनी सांगितले की, अनेक निर्दोष युवकांना विनाकारण अटक केली आहे. आपल्या मुलाला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या एकट्याच्या उत्पन्नावर आमचे घर चालते. त्याचे काही बरेवाईट झाल्यास आम्हाला कोण पाहणार? त्याला नाहक तुरुंगात डांबलेले पोलीस पाहणार का? असा सवाल करून, आधी आरोप सिद्ध होऊ द्या, मग शिक्षेचे पाहू असे सांगून मुलाच्या सुटकेची मागणी त्यांनी केली.
सावित्री यांनी सांगितले की, आमच्यात कन्नड-मराठी असा कसला भेदभाव नाही. धर्मवीर संभाजी चौकातील घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या युवकांमध्ये निर्दोष युवकांचा समावेश आहे. यातील एक इंजिनिअर तर दुसरा सीए आहे. प्रामाणिकपणे काम करून ते कुटुंब चालवितात. या घटनेत जे खरोखरच दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा, परंतु ज्या निष्पाप, निर्दोषी युवकांना अटक केलीय, त्यांना सोडा.
आणखी एका पालक महिलेने सांगितले की, पोलीस राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा लावून कसे काय तुरुंगात डांबू शकतात? खोट्या गुन्ह्यांत अडकवून युवकांचे भविष्य संकटात टाकण्यात येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांत काहीजण विद्यार्थी आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे खर्या दोषींवर कारवाई करण्याचे आणि निर्दोष बंधितांची सुटका करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …