बेळगाव : उद्यमबाग येथील कारखान्यात काम करणाऱ्या गजानन गावडे या कामगाराने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टीचे दर्शन घडवीत सुवर्णपदक पटकाविले.
बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत व्यायाम करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याने, त्याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला.
बेळगांव मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांनी मायक्रो असोसिएशनतर्फे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गजानन गावडे याला सन्मानित केले आणि शुभेच्छा दिल्या.
गजानन गावडे याला तो काम करीत असलेल्या कारखान्याचे मालक सदानंद शिनोळकर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे.
सत्कार समारंभावेळी प्रशिक्षक विकास शहापूरकर, मॅनेजर निलेश रजाईकर, मायक्रो असोसिएशनचे सदस्य राजू वरपे आणि कामगार उपस्थित होते.